मराठी गझल





कशी ठेवली कशी टिकवली दुःखावर मी दहशत माझी
या दुनियेला कळेल बहुधा मी गेल्यावर किंमत माझी ..

श्रीमंती कोरडी मिळवणे एव्हाना जमले असते , पण
लाचारी तारण देण्याइतकीही नव्हती ऐपत माझी...

जितका पैसा लाटत गेलो तितकी गरिबी वाढत गेली
जितका वाटत गेलो पैसा तितकी झाली बरकत माझी

केवळ हसणे बघून माझे उंबऱ्यातले दुःख परतले 
बहुधा त्याला असेल रुचली ही रडण्याची पद्धत माझी...

माझ्या दारिद्र्यावर माझे शत्रू कधीच नव्हते हसले
पण मित्रांनी वेळोवेळी मस्त काढली इज्जत माझी...

साधन हाती असूनसुद्धा हिंडत बसलो जन्म हजारो
मी देहाला साध्य समजलो इथेच झाली गफलत माझी...

- संतोष वाटपडे

दुःख प्रेमातून माझ्या वेगळे करता न आले
सोडुनी गेलीस तेव्हा मोकळे रडता न आले ...

अंगणी खोट्या सुखाचा मोसमी पाऊस झाला
केवढे दुर्भाग्य माझे त्यातही भिजता न आले ...

स्वप्न दारी पापण्यांच्या यायचे दररोज फिरण्या
मात्र डोळ्यांना बिचाऱ्या स्वप्नही बघता न आले ...

राहिला संवाद नाही ..भेटणे नशिबात नाही 
सत्य असुनी काळजाला मान्य ते करता न आले...

युद्धभूमीवर रथाचा... सारथी श्रीकृष्ण नव्हता
आप्त माझ्या वेदनेशी शेवटी लढता न आले...

याच प्रश्नाने अघोरी नेहमी छळले मनाला
श्वास केले बंद तरिही का मला मरता न आले ...!

-- संतोष वाटपाडे


तुझ्या स्निग्ध स्पर्शातुनी वेचले मी जरी पौर्णिमेचे दुधी चांदणे
मला पाहिजे ती निळाई न आली वृथा काढली मी तुझी पैंजणे ..

किती कोवळे श्वास सांडून गेले किती वेळ गंधाळली कस्तुरी
जिव्हाग्रासवे कोरली एक लेणी प्रकाशीत झाली जुळी कोंदणे ..

नकारातुनी मूक होकार आले दिवे मंद झाले विझू लागले
जणू ऐकली आर्जवे सर्व त्यांनी तुझे ऐकले लाघवी बोलणे

फटीतून कौलातल्या आत आला बिछान्यावरी निर्दयी चांदवा
कधी स्पर्शली मेखला मत्त त्याने कधी चुंबिली संयमी काकणे ..

स्पृहा कैद केल्यास देहात साऱ्या मला मात्र पूर्णत्व नाही दिले
उभी रात्र तिष्ठावली उंबऱ्याशी तुला देत होती जणू दूषणे..

-- संतोष वाटपाडे

फक्त शब्दांनी जगाची हार झाली पाहिजे
लेखणीचीही अशी तलवार झाली पाहिजे..

गायचा आहे असा मल्हार मजला रोज की
आसवे डोळ्यातली फनकार झाली पाहिजे ..

घाव देताना तिने छातीत द्यावा नेमका 
प्रेयसी तेव्हातरी दिलदार झाली पाहिजे..

एकही जखमेस खपली यायला आता नको
वेदना माझी तशी दमदार झाली पाहिजे..

काढ देहातून काळिज संपली तगमग प्रिये 
ऐक ना.. चिरफाड ही अलवार झाली पाहिजे..

-- संतोष वाटपाडे

https://www.facebook.com/swatpade


Comments

Popular posts from this blog

मराठी गझल

मराठी गझल