मराठी गझल
मस्करीची कुस्करी होऊ नये
नेमकी अफवा खरी होऊ नये
लागला आहे लळा मलमा तुझा
ही जखम आता बरी होऊ नये
एक साधा चर दिसत आहे मला
काळजी घेऊ दरी होऊ नये
जन्म एका पावलातच संपला
उंच इतकी पायरी होऊ नये
दोन ओळींचे मरण येवो मला
शेवटी कादंबरी होऊ नये
गोविंद नाईक
नाव किनाऱ्याकडे वळवली नाही
मग लाटांची भीती उरली नाही
तशीच आहे शाल कपाटामध्ये
ती गेल्यावर थंडी पडली नाही
रोज परीक्षा निकाल रोजच असतो
कधीच इथली शाळा सुटली नाही
त्या दुःखाचे दुःख कुणाला सांगू
ज्या दुःखावर कविता सुचली नाही
झोपडीतली भूक उपाशी निजली
बंगल्यातली पंगत उठली नाही
उगीच शोधत शोधत खाली आलो
मला स्वतःची जागा कळली नाही
झाडाला बांधून ठेवली होती
पण तुटलेली फांदी जगली नाही
सताड उघडे आहे वादळ माझे
मी वाऱ्याची कडी लावली नाही
शब्द एकही खरेपणाचा नव्हता
म्हणून त्याची गाथा तरली नाही
कडा अजुनही उंच वाटला असता
दरी पुरेशी खोल उतरली नाही
मुक्कामाला निमित्त झाले असते
पण शेवटची गाडी चुकली नाही
गोविंद नाईक
कधी कधी चुकतात मंदिराकडच्या वाटा
टेकवला जातो फसव्या चरणांवर माथा
फुलांमधे राहून वेगळा पडत असावा
कठोर नसतो जन्मतःच कुठलाही काटा
तुटू नये केव्हाच कुणाच्या इच्छेसाठी
चमकत राहो दिशा सांगण्यासाठी तारा
कळप वासरांनीच खचाखच भरला आहे
फक्त लंगड्या गायीसाठी उरली जागा
मुडद्यांना कबरीत राहुद्या इतिहासाच्या
वर्तमान ऐकतो फक्त सजिवांच्या हाका
परिस्थिती अनुकूल वादळासाठी आहे
फिरतो आहे एक वाट चुकलेला वारा
तलाव , डबके , समुद्र या चैनीच्या गोष्टी
ओंजळीतही जिवंत राहू शकतो मासा
करा चौकशी भुसभुशीत जमिनीची आधी
इमल्यांच्या आधीच कसा कोसळतो पाया ?
सिद्ध करत आहेत खाच खळगे रस्त्याचे
माझ्या पायांसाठी नाही उजेड माझा
कोण बुडवतो आहे त्याला किंमत नाही
कोणी लिहिली आहे त्यावर ठरते गाथा
गोविंद नाईक
रात्रीच्या स्वप्नांचा डब्बा उलटा केला
दिवसाच्या अंगणात थोडा कचरा केला
तसा इशारा कळला नसता कुणास माझा
तुझ्या लाजऱ्या नजरेने बोभाटा केला
दुःख दिले वाटून सारखे देहाला .. पण
स्वभाव डोळ्यांचाच नेमका हळवा केला
आत ओतले नंतर मिश्रण ग्रह ताऱ्यांचे
आधी त्याने आकाशाचा साचा केला
त्यांनी त्यांची हौस फिटवली गिरबिटण्याची
तुमच्या नकळत ज्यांनी कागद तुमचा केला
कटूनसुद्धा टिकला आहे पतंग माझा
आसपासच्या वाऱ्याचा मी मांजा केला
काय खदखदत आहे त्याच्या मनात नक्की ?
कितीतरी वेळाने त्याने मुजरा केला
कुठल्याही सिक्वेन्समधे बसणारा नव्हता
म्हणून त्याला मी हुकुमाचा पत्ता केला
जेव्हा जेव्हा चर्चा झाली आयुष्याशी
मी जगण्याला फक्त कळीचा मुद्दा केला
गोविंद नाईक
रात्रीच्या स्वप्नांचा डब्बा उलटा केला
दिवसाच्या अंगणात थोडा कचरा केला
तसा इशारा कळला नसता कुणास माझा
तुझ्या लाजऱ्या नजरेने बोभाटा केला
दुःख दिले वाटून सारखे देहाला .. पण
स्वभाव डोळ्यांचाच नेमका हळवा केला
आत ओतले नंतर मिश्रण ग्रह ताऱ्यांचे
आधी त्याने आकाशाचा साचा केला
त्यांनी त्यांची हौस फिटवली गिरबिटण्याची
तुमच्या नकळत ज्यांनी कागद तुमचा केला
कटूनसुद्धा टिकला आहे पतंग माझा
आसपासच्या वाऱ्याचा मी मांजा केला
काय खदखदत आहे त्याच्या मनात नक्की ?
कितीतरी वेळाने त्याने मुजरा केला
कुठल्याही सिक्वेन्समधे बसणारा नव्हता
म्हणून त्याला मी हुकुमाचा पत्ता केला
जेव्हा जेव्हा चर्चा झाली आयुष्याशी
मी जगण्याला फक्त कळीचा मुद्दा केला
गोविंद नाईक ....
Comments
Post a Comment