मराठी गझल
माझ्या तिरडीच्या भोईंनो माफ करा
मला लाभलेल्या सोयींनो माफ करा
जगत राहिलो, तुमच्या स्वीकारून चुका
बस निर्दोष ठरत दोषींनो माफ करा
न्याय तुम्हाला देऊ शकलो नाही मी
नशेत सुचलेल्या ओळींनो माफ करा
चुकून आधी जन्माला आलो आम्ही
नव्या जमान्याच्या पोरींनो, माफ करा
फार लावली सवय तुम्हाला मी माझी
मला लागलेल्या सवयींनो माफ करा
हेतुपुरस्सर झाल्या त्यांनी मुजरा घ्या
उगाच झालेल्या भेटींनो माफ करा
राजा ठरलो असतो या लाचारांचा
मी न चाललेल्या चालींनो, माफ करा
एक देवपण हाक मला मारत आहे
सवंग, लसलसत्या उर्मींनो माफ करा
बरा व्हायचे होते मला स्वभावाने
मी न काढलेल्या खोडींनो माफ करा
-'बेफिकीर'!
ती गझल- 06 जुलै 2017
==================
जी मनावरती नशा बनुनी पसरते ती गझल
जी कवीपासून मदिरा दूर करते ती गझल
भांडणे होतात माझी सारखी माझ्यासवे
जी स्वतःबद्दल स्वतःचे कान भरते ती गझल
जो तिला प्रत्येकवेळी साथ देतो तो कवी
ऐनवेळी जी कवीलाही विसरते ती गझल
दाद वरवरचीच घेतो आत्मप्रौढीने कुणी
जी मुळापासून हृदयाला उकरते ती गझल
फेकली जाते प्रवाहातून जेव्हा सारखी
भोवरा शोधून त्यामध्ये उतरते ती गझल
प्रियकराच्या वेदनांना मानते प्रसुतीकळा
प्रेयसीच्या बेवफाईने बहरते ती गझल
कडकडाटाची अपेक्षा ठेवती सारे.... तिथे
एक टाळी वाजल्यावर जी बिथरते ती गझल
वाहुनी चिंता जगाच्या वाकते सार्यांपुढे
चांगले वागून जी बदनाम ठरते ती गझल
-'बेफिकीर'!
स्मरणांची झटकून जळमटे रोज करू पाटी कोरी
रोज नवी आरास क्षणांची येत राहते सामोरी
क्षणोक्षणी दिसतात लगडलेल्या इच्छा नवनव्या तिला
क्षणोक्षणी दुर्बल होते आयुष्याची बळकट दोरी
गतकाळाला "करायचे ते कर तू" म्हटलो तोऱ्याने
बोलणे तसे ठामच होते, पण चर्या गोरीमोरी
दोघांपैकी कुणीच नाही सोसत माझ्या हृदयाला
स्वभाव माझा हळवा आहे, शरीर माझे माजोरी
आधी असत्या तर आम्हाला प्रेमबीम कळले असते
कुणास ठाउक तेव्हा का नव्हत्या या हल्लीच्या पोरी
काय रंग होईल न जाणे जवळ आणखी येण्याने
नुसत्या नजरानजरीनेही होते आहे ती गोरी
तत्व, नियम, काही न पाळणे, बस रमणे अपुल्यामध्ये
फिकीर कर तू, तुला जमेना 'बेफिकीर'ची चाकोरी
-'बेफिकीर'!
मनात क्रोध साठतो, तटस्थ व्हायला हवे
अथांग शांततेकडे मला निघायला हवे
विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न आपला
बनून धूलिकण हवेत विरघळायला हवे
अनिश्चितात बावरून नाव हेलकावते
दिसेल त्या दिशेस स्वत्व वल्हवायला हवे
जुन्यास लांघल्यावरी नवे शिखर सतावते
स्वतःच एकदा तरी शिखर बनायला हवे
हिशोब कोणता इथे अपूर्ण व्हायला नको
रडून जन्म घेतला, हसून जायला हवे
-'बेफिकीर'!
रूपवान आहे कोणी, शीलवान आहे
मीच एक आहे ज्याचे, मन महान आहे
का हताश व्हावे मी की, भेट होत नाही
ती जगात आहे तर जग, खूप छान आहे
त्या मनात होतो तेव्हा, प्रश्न हा पडेना
या जगात अपुले नक्की, काय स्थान आहे
ज्या क्षणास दुःखांनाही, लावला लळा मी
एक एक सुख माझे तर, गपगुमान आहे
मद्य प्राशणारा कायम, सत्य बोल बोले
तो नशेत आहे ज्याला, आत्मभान आहे
अर्थ रामदासांनी का लावला चुकीचा
शब्द फक्त पुरुषांसाठी, सावधान आहे
एकट्यास सांगा 'सारे, एकटेच येथे'
दृष्टिकोन देणेसुद्धा, नेत्रदान आहे
एक मी न आलो याचा सूड केवढा हा
मैफिलीत कोणाचाही मानपान आहे
फक्त अंतराला मधल्या, ठेव अंतरावर
जन्मणे नि मरणे बाकी, समसमान आहे
खूप काळ आहे हाती, सोड या भ्रमाला
हे जहाज नाही मित्रा, हे विमान आहे
त्यास तर गझल सुचते...तो.... गझलला सुचेना
तो लहान आहे सोडा, तो लहान आहे
होय, चांगला होता पण, भावलाच नाही
'बेफिकीर'ची इतकीशी दासतान आहे
-'बेफिकीर'!
मूर्तीपूजा त्यागावी हा विचार करतो आहे
घरातल्या साऱ्या मूर्तींना अभय मागतो आहे
प्रचंड प्रस्तावना, पुढे आकांत देहबोलीचा
कविता ह्या शब्दाचा हल्ली अर्थ बदलतो आहे
जे न स्वतःला कळते ते कळते हे जग भासवते
भले कळो ना कळो मला मी, जगास कळतो आहे
उबग येत आहे त्याचा, जो हयात आहे सध्या
मेलेल्यांच्या जगण्याचा तिटकारा करतो आहे
एकेकाळी वाट जायची तिकडे चालत होतो
आता जेथे पाय टाकतो, वाट काढतो आहे
'बेफिकीर' होण्यासाठी बस गझल पुरेशी नसते
हो सच्चा माणूस, एक माणूस विनवतो आहे
-'बेफिकीर'!
Comments
Post a Comment